11 December 10:33

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार- मुख्यमंत्री


राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, नागपूर: “शेतीसोबतच पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा असल्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे प्रयोजन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

रामगिरी येथे विदर्भ आणि मराठवाडाच्या संदर्भात दुग्धविकास प्रकल्पाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते, भुपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, कृषी सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.

“तसेच राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाला अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून, मदर डेअरीलाही शासन सर्वतोपरी मदत करेल. या व्यवसायाबद्दल शेतकऱ्यांसोबतच गावातील नागरिक आणि सरपंचांनासुध्दा माहिती देणे गरजेचे आहे. मदर डेअरीसाठी राज्यातील जागांची आणि सुविधांची माहिती उपलब्ध करून द्यावी. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी देण्यात येईल. जलयुक्त शिवारच्या धर्तीवर जनावरांसाठी चारायुक्त शिवार राबविण्याचा मानस आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

"तर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून २५ लक्ष लिटर इतके दूध संकलन होऊन त्याचे मार्केटिंग झाले पाहिजे. केंद्राकडून या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे चित्र नक्कीच बदलणार आहे," असे गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.