18 May 16:15

राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील: मुख्यमंत्री


राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील: मुख्यमंत्री

कृषिकिंग, सांगली: राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहे. या वर्षी जवळपास ६ हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आणि याचे संपूर्ण श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंढी आणि बागलवाडी येथे पाणी फौंडेशन अंतर्गत जलसंधारण कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावेळी ते संवाद साधताना बोलत होते.

एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही. तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली, तिला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करत आहेत, असे प्रतिपादनही फडणवीस यांनी यावेळी केले आहे.

दुष्काळाचे आव्हान स्वीकारून, दुष्काळाशी दोन हात केले व त्याला पराभूत केले, याबद्दल जनसहभागाचे त्यांनी अभिनंदन केले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहे.