28 May 10:59

राज्यातील सिंचन प्रकल्पांना मोदींची ३६ हजार कोटींची मदत- मुख्यमंत्री


राज्यातील सिंचन प्रकल्पांना मोदींची ३६ हजार कोटींची मदत- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: “केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी गेल्या ४ वर्षांत तब्बल ३६ हजार कोटींचा निधी दिला आहे. दुष्काळात राज्याला ८ हजार कोटींची अतिरिक्त मदतही केंद्र सरकारने केली आहे. इतर राज्याच्या तुलनेत केंद्राचा सर्वाधिक निधी महाराष्ट्राच्या वाट्यास आला आहे. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले. त्यामुळे राज्याने विकासात आघाडी मिळवली आहे,” असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व मुख्य प्रवक्ते माधव भंडारी हेही उपस्थित होते.

आघाडी सरकारच्या काळात राज्यातले सिंचन प्रकल्प अर्धवट पडले होते. आम्ही हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले. त्यापैकी अर्धवट असेलल्या अशा १०६ प्रकल्पांना मोदी सरकारने ३६ हजार कोटींचा निधी दिला आहे. दुष्काळातही केंद्राने सढळ हाताने मदत केली. त्यासाठी दोन दुष्काळात राज्याला ८ हजार कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. केंद्राच्या मदतीने राज्यात मोठ्या संख्येने कोल्ड स्टोअरेज आणि फूड प्रोसेसिंग प्रकल्प मंजूर केले गेले आहेत. राज्यात ५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील १५ हजार किमीच्या महामार्गांना मंजुरी दिली. वर्षानुवर्षे रखडलेले तीन रेल्वेमार्ग आता कार्यान्वित झाले आहेत. पीक विमा योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होत आहे. पंतप्रधान आवास योजनेत राज्यात साडेसहा लाख घरे बांधली आहेत. मोदी सरकारच्या धडाकेबाज कामगिरीमुळेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी उत्पादनाचा विक्रम नोंदवला गेला. भारत आता जगातील सर्वात मोठी विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

मात्र, असे असले तरी गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झालेले कृषी विषयक अनेक अहवाल हे मोदी सरकारच्या काळात भारतीय कृषी क्षेत्राची घसरण झाल्याचेच दर्शवितात. त्यामुळे महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हा येणारा काळच ठरवेल.