04 January 11:30

राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून चार वर्षांत ५० हजार कोटींची मदत- मुख्यमंत्री


राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून चार वर्षांत ५० हजार कोटींची मदत- मुख्यमंत्री

कृषिकिंग, औरंगाबाद: "शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, सरकारने गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा, अनुदान व इतर विविध योजनांद्वारे ५० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तसेच यावर्षीही दुष्काळाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्या निधीतूनही शेतकऱ्यांना पीक विमा आणि थेट स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

फुलंब्री येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय इमारत फुलंब्री, फुलंब्री-कान्होरी-बाबरा-नाचनवेल रस्ता व पुलांची कामे इत्यादी १० विकास कामांच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते.

राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, त्याची केंद्रीय पथकाद्वारे पाहणी करुन दुष्काळ अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्यावर ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर येण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. तो निधीदेखील लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा, थेट अनुदान या स्वरुपात देण्यात येणार आहे. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.