31 July 10:40

राज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप; ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानात चढ-उतार


राज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप; ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानात चढ-उतार

कृषिकिंग, पुणे: राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (३ ऑगस्ट) कायम राहणार असल्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढला आहे. कोकण, मराठवाडा अाणि विदर्भात सर्व ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात तापमान २७ ते ३० अंशांच्या असपास आहे. सोमवारी (३० जुलै) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सोमवारी उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे क्षेत्र पुढील दोन दिवस याच भागात सक्रिय राहणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. ईशान्य भारतात मात्र पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाची उघडीप कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.टॅग्स