13 April 12:06

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता- आयएमडी


राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: राज्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. येत्या रविवारी (१५ एप्रिल) मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कमी होत नाही, तोच बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचबरोबर बाष्पही या भागावरून वाहत होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात जोरदार वारा वाहून मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. मात्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला नाही. आता पुन्हा पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे.

तर विदर्भात १३ आणि १४ एप्रिलला तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता असून, उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. असेही हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.