25 September 11:26

राज्यात गेल्या ४ वर्षात प्रथमच सप्टेंबर महिना कोरडा; दुष्काळाचे सावट


राज्यात गेल्या ४ वर्षात प्रथमच सप्टेंबर महिना कोरडा; दुष्काळाचे सावट

कृषिकिंग, औरंगाबाद: राज्यात २०१४ च्या दुष्काळानंतर यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रथमच पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, मक्यासह प्रमुख पिकांच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. जमिनीच्या पोतानुसार उत्पादन कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराज्याच्या सर्व आशा आता परतीच्या पावसावर आहेत.

मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर ७ जिल्ह्यांत पावसाची तूट लक्षणीय वाढली आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मॉन्सून देशातून परतण्यास २९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या उत्तर भारतीय राज्यांमध्ये सध्या पाऊस सुरु असला तरी आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम राजस्थानात मंगळवारपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील आर्द्रता कमी होऊन जमिनीलगत वारे वाहण्यास अनुकूल स्थिती होत आहे. ही सर्व मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावर्षी मॉन्सूनच्या परतीला विलंब झाला असून, तो १५ ऑक्टोबरपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे.टॅग्स