04 July 18:31

राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज


राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज

कृषिकिंग, पुणे: मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने उद्यापासून (५ जुलै) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (६ जुलै) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, रविवारपासून (८ जुलै) राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण किनारपट्टीवर सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून, मुंबई व उपनगरात पावसाने पाणीच पाणी केले आहे. तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. तर मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची उघडीप आहे. मात्र, उत्तर बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (६ जुलै) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, शनिवारी (७ जुलै) मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.टॅग्स