10 July 10:49

राज्यात आतापर्यंत ३० टक्के जास्त पाऊस; मात्र ९ जिल्ह्यांत पावसाची तूट कायम


राज्यात आतापर्यंत ३० टक्के जास्त पाऊस; मात्र ९ जिल्ह्यांत पावसाची तूट कायम

कृषिकिंग, पुणे: कोकण, मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला असताना जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील ९ जिल्ह्यांत पावसाची तूट कायम अाहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, गोंदिया, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाने १ जून ते ९ जुलैपर्यंतच्या अपेक्षित पावसाची सरासरीही अद्याप गाठलेली नाही. याउलट नांदेड, नागपूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांत या काळात अति पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३० टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे वेधशाळेने १० ते १३ जुलै या काळात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हिमालयाच्या कुशीत गेलेला मान्सूनचा आस (ट्रफ) आता दक्षिणेकडे सरकून सामान्य स्थितीत आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. अायएमडीनुसार, सध्या देशात हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि गुजरात राज्य आणि आसपासच्या क्षेत्रात चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे. तर कर्नाटक -केरळच्या किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, ते १३ जुलैपासून अधिक तीव्र होईल. त्यामुळे मध्य आणि दक्षिण भारतात या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊन चांगला पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये १ जून ते ९ जुलै याकाळात अति पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ या २२ जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सांगली, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, गोंदिया या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. (स्रोत : आयएमडी, १ जून ते ९ जुलैपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार)



टॅग्स