27 August 11:15

राज्यभर जोरदार तर विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता


राज्यभर जोरदार तर विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: आजपासून राज्यातील बहुतांश भागात विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. सध्या मध्यप्रदेशात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तर तिकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुन्हा पाऊस जोर धरू शकतो. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आधीच अतिवृष्टीचा तडाखा सहन करणाऱ्या विदर्भासाठी पुढचे दोन दिवस आणखी संकटाचे ठरू शकतात. कारण सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे आज आणि उद्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट तारखेला पावसाचा जोर वाढेल. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची होण्याची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. या पार्श्वभूमीवर नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.टॅग्स