20 June 16:23

राजस्थान, मध्यप्रदेशातील उन्हामुळे कांदा वधारला; १३५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ


राजस्थान, मध्यप्रदेशातील उन्हामुळे कांदा वधारला; १३५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. इतर राज्यांतून मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कांद्यास सरासरी ९२० रुपये भाव मिळाला. काल (मंगळवारी) सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ होऊन, तो सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३५१ रुपयांपर्यंत पोहचला आहे. यापुढे काही दिवस तरी कांदा दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगत आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या १५ ते २० दिवसांपासून कांदा दरात वाढ होत आहे. दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एप्रिल महिन्यात बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा ६५० रुपयांनी विक्री केला होता. साधारणपणे २० मेपर्यंत हेच भाव होते. मात्र, त्यानंतर सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मे महिन्याच्या अखेरीस कांदा ८०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. आणि आता कांद्याने हजारी पार केल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा दराबाबत आशा पल्लवित झाल्या आहे. मागील वर्षी जून महिन्यात कांद्याचे सरासरी दर ५५० रुपये होते. त्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ कांदा दुप्पट दराने विकला जात आहे.

कांदा दरात तेजी आली की, केंद्र सरकारतर्फे हालचाल करून भाव पाडण्याचे प्रयत्न केले जातात. चाळीत साठवलेला कांदा विक्रीस आणला जात असल्याने चार पैसे मिळावे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे दर वाढले तरी शासनाने हस्तक्षेप करू नये, अशीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.



टॅग्स