05 March 17:58

राजस्थानात गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


राजस्थानात गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कृषिकिंग, सिकर(राजस्थान): हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राजस्थानात गारपीटीसह अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजस्थानच्या झुंझुनूं, चूरू, सीकर, अलवर व भरतपुर या जिल्ह्यांमध्ये ६० ते ९० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्व राजस्थानातील नागोर जिल्ह्यालाही गारपिठीचा फटका बसला आहे.

यामध्ये सीकर जिल्ह्यातील पाच तहसीलमधील ४० गावांमध्ये गारपीटीची चादर पाहायला मिळाली. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, जौं, मोहरी, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सर्वाधिक नुकसान हे कांद्याच्या बियाण्याचे (डोंगळे) झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गारपीटग्रस्त जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून, अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात ७ मार्चला गारपीट होण्याची शक्यता
दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी अर्थात ७ मार्चला गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे येत्या बुधवारी म्हणजेच ७ मार्चला उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे.