27 July 10:02

येत्या चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता- आयएमडी


येत्या चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: येत्या चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा असून, पुढील २ ते ३ दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने येत्या आठवड्यात मध्य व उत्तर भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील पाऊसमानही पुढील आठवड्यात सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

२७ ते २९ जुलै यादरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील २६ जुलै ते १ आॅगस्ट यादरम्यानचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यात आयएम हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, १ जून ते २५ जुलैपर्यंत देशात सरासरीच्या ३ टक्के कमी पाऊस झाला असून, मध्य भारतात सरासरीच्या १६ टक्के, दक्षिण भारतात ९ टक्के जादा पाऊस झाला आहे. पूर्व व उत्तरपूर्व भारतात सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, त्यामुळे या भागात पाऊस होत आहे़. येत्या २ ते ३ दिवसांत पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पाऊसमान चांगले राहण्याची शक्यता आहे.