16 April 17:05

यावर्षी सरासरीच्या ९७ टक्के पाऊस; आयएमडीचा पहिला दीर्घकालीन अंदाज


यावर्षी सरासरीच्या ९७ टक्के पाऊस; आयएमडीचा पहिला दीर्घकालीन अंदाज

कृषिकिंग, नवी दिल्ली: स्कायमेट या खासगी हवामान संस्थेपाठोपाठ भारतीय हवामान विभागानेही (आयएमडी) बळीराजाला गोड बातमी दिली आहे. यावर्षी सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आज पत्रकार परिषद घेऊन मॉन्सूनचा यावर्षीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. गेल्या वर्षी आयएमडीने ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. तर विभागाच्या अंदाजाप्रमाणे गेल्यावर्षी पाऊस ९५ टक्के पाऊस नोंदवलाही गेला आहे.

दरम्यान, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही यावर्षी देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. 'स्कायमेट'ने आपल्या अंदाजात म्हटले होते की, “२०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात १०० टक्के पाऊस पडेल. आणि विशेष म्हणजे स्कायमेटने यावर्षी दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही. असे म्हटले होते.

हवामान विभागाच्या या अंदाजानंतर दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, पिकाला भाव न मिळणे, यांसारख्या एक-ना-अनेक संकटांचा सामना करत असलेल्या बळीराजाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.टॅग्स