04 April 10:30

यावर्षी देशभरात चांगला पाऊस पडणार- स्कायमेट


यावर्षी देशभरात चांगला पाऊस पडणार- स्कायमेट

कृषिकिंग, पुणे: उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा स्कायमेटने या संस्थेने वर्तवला आहे. 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार, “२०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी पाऊस पडेल.”

यावर्षी देशभरात सरासरी ८८७ मिमी अर्थात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल. तर महाराष्ट्रातही या काळात उत्तम पाऊसमान असेल. येत्या जून महिन्यात सरासरीच्या सर्वाधिक १११ टक्के, जुलैमध्ये ९७ टक्के, ऑगस्टमध्ये ९६ टक्के, तर सप्टेंबर सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. असेही स्कायमेटने आपल्या अंदाजात नमूद केले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्यानेही (आयएमडी) मागील महिन्यात २ मार्चला आपला यावर्षीचा पहिला पावसाचा अंदाज वर्तवला होता. आपल्या या अंदाजात यावर्षी राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले होते. तसेच ला-नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारली असून, पर्जन्यमान चांगले राहण्याची शक्यता वाढली आहे. ला-नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असेही हवामान खात्याने आपल्या या अंदाजात म्हटले होते.