07 December 10:55

मोदींना मनीऑर्डर पाठवल्याने शेतकरी साठे आरोपीच्या पिंजऱ्यात


मोदींना मनीऑर्डर पाठवल्याने शेतकरी साठे आरोपीच्या पिंजऱ्यात

कृषिकिंग, नाशिक: गेल्या आठवड्यात कांद्याला अवघा १ रुपया ४० पैसे भाव मिळाल्याने उद्विग्न झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०६४ रुपयांची मनी ऑर्डर पाठवली होती. शेतकऱ्यांच्या समस्या व कष्टाचे मोल कळावे अशी प्रामाणिक भावना यामागे शेतकरी संजय साठे यांची होती. परंतु सत्ताधार्यांनी याचा वेगळा अर्थ काढत त्यांच्यामागे आता प्रशासन आणि चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे समोर आले आहे.

संजय साठे यांनी सदर कृत्य हे प्रसिद्धी स्टंट म्हणून तर केले नाही ना? कि कोणत्या पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी केले? त्यांचे राजकीय संबंध आहेत का? अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकारी प्रशासन गोळा करत आहे. लासलगाव बाजार समितीने यासाठी दोन पानांचा अहवाल सादर केलेला आहे.

त्या अहवालानुसार सध्या लाल कांद्याची आवक सुरु असून, साठे यांचा उन्हाळ्यातील साठवून ठेवलेला कांदा असून त्याला लाल रंग नाही. तसेच तो काळा पडलेला असल्यामुळे त्याला भाव मिळाला नाही. असा खुलासा बाजार समितीकडून करण्यात आला आहे. त्यादिवशी लासलगाव बाजारसमिती तसेच उपबाजारात झालेले लिलाव त्यांचे भाव याचा तक्ता जोडण्यात आला आहे.

संबंधित अहवाल समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी संजय साठे यांना तीव्र मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. पडलेल्या बाजार भावाचे खापर आपल्या कांद्याच्या दर्जावर फोडल्याने त्यांनी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्याजवळ आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी होळकर यांनी अशा प्रकारचा कोणताही अहवाल बाजार समितीकडून दिला गेला नसल्याचे त्यांना सांगितले.

दरम्यान, शेतकरी साठे यांनी आपल्या ट्रॅक्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकऱ्यांच्या भावना लिहिलेला फलक लावल्यामुळे यामागील कारवाईचा बडगा भाजप सरकारने उगारल्याची चर्चा बाजार समितीतील सामान्य शेतकऱ्यांमध्ये दिसून आली. सरकारच्या सदरील कृत्यामुळे शेतकरी वर्गातील नाराजीत भर पडल्याचे दिसून येत आहे.