29 June 07:00

मॉन्सूनचा जोर वाढण्यास हवामान अनुकूल


मॉन्सूनचा जोर वाढण्यास हवामान अनुकूल

हवामान सल्ला (१ जुलै २०१७): मॉन्सून पावसाची प्रगती समाधानकारक नाही. जुलैच्या सुरुवातीस मॉन्सून दिल्ली व राजस्थान पर्यंत पोहचतो तो सध्या गुजरात आणि मध्यप्रदेश पर्यंत पोहचला आहे. सध्याचे स्थितीत तो १५ दिवस उशिरा उत्तर भारतातील काही प्रदेशात पोहचेल तर त्यास म्हणावा तसा जोरही नाही. जेव्हा जून महिन्यात खंड पडतो तेव्हा मॉन्सूनची गती ओघानेच कमी होते. यावर्षीही पूर्व बाजूने वारे येऊन मॉन्सून सुरु झाला.
१ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रावर पूर्व पश्चिम दिशेने १००४ हेप्टापास्कल तर महाराष्ट्राचे उत्तरेकडील सीमाभागाचेआत आणि पूर्वभागावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. पूर्वकिनारी भागात हवेच्या कमी दाबाची क्षेत्र तयार होतील. हिमालयाचे पायथ्याशी काश्मीरपासून, कोलकाता पश्चिम बंगालपर्यंत केवळ ९९८ हेप्टापास्कल इतके हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन मॉन्सून वेगाने तेथे पोहचण्यास हवामान अनुकूल बनेल. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल. विशेषतः कोकण आणि विदर्भात पावसात वाढ होईल.
कृषिसल्ला: एकात्मिक तणनियंत्रण महत्वाचे
पेरणीनंतर २८ दिवसांनी कोळपणी करून दोन ओळीतील तण नियंत्रण करावे. त्यानंतर एकदल पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. दोन ओळीतील तण खुरपणी करून नियंत्रित करावे. उंच मोठी तणे उपटून त्यांचा नाश करावा. याशिवाय एकात्मिक तणनियंत्रण करतांना पेरणीनंतर लगेच रासायनिक तणनाशकाची फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणावर तण नियंत्रण करणे शक्य होते. याशिवाय पेरणी नंतर कोळपणी आणि खुरपणी केल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रासायनिक तणनाशकाची फवारणी करून तणनियंत्रण करणे गरजेचे आहे.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ