27 June 15:21

मॉन्सून तीन दिवसांत संपूर्ण उत्तर भारत व्यापणार


मॉन्सून तीन दिवसांत संपूर्ण उत्तर भारत व्यापणार

कृषिकिंग, चंडीगढ: दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मॉन्सूनला पूरक असे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार पासून मॉन्सून चांगला सक्रीय होणार आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, चंदिगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे चंदीगड हवामान विभागाचे संचालक सुरिंदर पाल यांनी सांगितले आहे.

तर रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात १८० मिमी पावसाची नोंदही झाली आहे. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्याला अरबी समुद्रावरून गुजरातच्या दिशेने येणारे वारे प्रतिरोध करत आहे. त्यामुळे मॉन्सून या आठवड्यात संपूर्ण उत्तर भारताला सामावून घेणार आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये २८-२९ जून, उत्तराखंडमध्ये २६-२९ जूनपर्यंत ५० ते ७५ मिमी पावसाची नोंद होऊ शकते. तर उत्तराखंडमध्ये २७ ते २९ जून दरम्यान ११५ मिमी ते २०० मिमी पावसाची शक्यता आहे. तसेच, उर्वरित भागांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.