08 June 17:17

मॉन्सून आला रे...; महाराष्ट्रात दाखल


मॉन्सून आला रे...; महाराष्ट्रात दाखल

कृषिकिंग, पुणे: उकाड्याने हैराण झालेले सर्वच मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मॉन्सूनची ही प्रतिक्षा आता संपली असून, आज अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अधिकृतरित्या जाहीर केले आहे. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून, रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सून साधरणत: ७ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशीराने मॉन्सून दाखल झाला आहे. कोकणात नियोजित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधीच (२९ जून) धडक देणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंतची वाटचाल पुर्ण करण्यास तब्बल ११ दिवसांचा कालावधी घेतला. माॅन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्या मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये, तर सोमवारपर्यंत (ता.११) मॉन्सून संपुर्ण राज्य व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ७ जून ते ११ जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने याआधीच वर्तविली आहे.