29 May 14:47

मॉन्सून आला रे...; केरळात दाखल- आयएमडी


मॉन्सून आला रे...; केरळात दाखल- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. ज्याची तुम्ही- आम्ही, आपण चातकासारखी वाट पाहत होतो. तो मान्सून देशाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला आहे. केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे.

मागील वर्षी ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल झाला होता. मात्र, यावर्षी मॉन्सूनचे त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच आगमन झाले असून, केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तिथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मॉन्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागाने मॉन्सून आल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. त्यामुळे आता केरळच्या किनारपट्टीवर पोहचल्यानंतर मॉन्सून ६ ते १० जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल. मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचे वेळेत आगमन होईल. असे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने काही प्रमाणात माघार घेतली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान ४० अंशांपर्यंत खाली आहे. तर तिकडे कोकणात रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.टॅग्स