28 May 12:12

मॉन्सून आज केरळात दाखल होण्याची शक्यता- आयएमडी


मॉन्सून आज केरळात दाखल होण्याची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: “नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. अरबी समुद्रातही मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याने आज मोसमी वारे केरळ आणि तमिळनाडूमध्ये प्रवेश करतील,” असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनने अंदमान बेटावरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा रविवारी पार केला आहे. तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरिन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागापर्यंत मोसमी वारे पोचले आहेत. त्यामुळे आज मॉन्सून केरळात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यापट्टीलगत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

तर इकडे अरबी समुद्रात केरळ, कर्नाटक किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यातही जाणवणार आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात सोमवार ते बुधवार या काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे, तर विदर्भात सोमवारी उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.टॅग्स