20 December 21:37

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेत आकडेवारीचा मोठा घोळ


मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेत आकडेवारीचा मोठा घोळ

कृषिकिंग, मुंबई: महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये, म्हणजेच प्रति टन २००० रूपये अनुदान देण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. या अनुदानाचा फायदा राज्यातील ७५ लाख टन कांद्यास मिळणार असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. यासाठी १५० कोटी रूपये खर्च येणार असून ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी मदत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र ही फसवणुक असल्याचे लगेच स्पष्ट होत आहे.

१) जर ७५ लाख टन कांद्यास प्रति टन २००० रूपये अनुदान द्यायचे झाले तर त्यासाठी १५०० कोटी रूपये लागतील, १५० कोटी नव्हे
२) ही मदत केवळ १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ज्यांनी कांद्याची विक्री केली त्यांना मिळणार आहे. ज्यांनी दर कमी आहे, वाहतुकीचा खर्च निघत नाही म्हणून उन्हाळ कांदा कुजवला त्यांना ही मदत मिळणार नाही.
३) अजूनही उन्हाळ कांद्याची १ ते ३ रूपये किलोने विक्री सुरू आहे. ज्यांनी १५ डिसेंबर नंतर कांदा विकला आहे त्यांना अनुदान मिळणार नाही.
४) महाराष्ट्राचं कांद्याचं वार्षिक उत्पादन हे ७५ लाख टन आहे. शेतकरी कांदा वर्षभर विकत असतात. मग दीड महिन्यात शेतक-यांनी ७५ लाख टन कांदा विकला हे सरकारनं कुठून शोधून काढलं? ७५ लाख टन कांद्यास कशी मदत मिळणार?
५) २०१६ मध्ये कांद्याचे दर पडल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आज दोन वर्षे उलटूनही अनुदान मिळाल नसल्याच शेतकरी सांगतात. आज जाहीर झालेल्या अनुदानाचा त्यांना लाभ होईल हे खरं का मानावं?
विश्लेषक
-राजेंद्र जाधव (कृषीमाल बाजाराचे अभ्यासक)टॅग्स