15 September 11:45

मुख्यमंत्रीही हवामान खात्यावर नाराज; थेट केंद्राला पत्र


मुख्यमंत्रीही हवामान खात्यावर नाराज; थेट केंद्राला पत्र

कृषिकिंग, मुंबई: मुंबईतील पावसाबद्दलचा चुकीचा अंदाज वर्तवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकारला नाराजीचे पत्र लिहिले आहे. २९ ऑगस्टला मुंबई आणि परिसरामध्ये सरासरी ३०० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे लोकलसह रस्ते वाहतूकही ठप्प झाली होती. त्याच दिवशी हवामान विभागाने पुढील २४ तासांत म्हणजे ३० ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

याच हवामान अंदाजाचा आधार घेऊन राज्य सरकारने जवळपास अघोषित शासकीय सुट्टी जाहीर केली होती. सरकारी कार्यालयातील अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या सरकारी विभागातील कर्मचा-यांनीच हजर रहावे असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे ३० ऑगस्टला मुंबई आणि परिसरातील अनेक सरकारी कार्यालयांत शुकशुकाट होता.

मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही ३० ऑगस्टला मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र ३० ऑगस्टला पावसाने तुरळक हजेरी लावली, आणि दिवसभर लख्ख ऊन पडले होते. थोडक्यात हवामान विभागाचा ३० ऑगस्टचा मुसळधार पावसाचा अंदाज साफ चुकला होता.

थोडक्यात हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शासकीय कामाचा एक दिवस नाहक वाया गेला. म्हणून मुख्यमंत्र्यांनी या चुकीच्या हवामान अंदाजाविरोधात नाराजी व्यक्त करणारे एक खरमरीत पत्र केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ.हर्षवर्धन यांना लिहिले आहे. त्यात त्यांनी हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शासकीय कामकाजाचा एक दिवस वाया गेल्याचे म्हटले आहे.टॅग्स