12 January 11:33

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोमवारी राज्यभरातील शेतकऱ्यांशी ‘लोकसंवाद’


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोमवारी राज्यभरातील शेतकऱ्यांशी ‘लोकसंवाद’

कृषिकिंग, मुंबई: शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारीला ‘लोकसंवाद’ साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर १४ जानेवारीला (सोमवारी) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री आणि शेतकरी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘लोकसंवाद’ होणार आहे. हा लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.