30 June 18:08

मुंबईसह उत्तर भारतात मुसळधार पाऊस


मुंबईसह उत्तर भारतात मुसळधार पाऊस

कृषिकिंग, नवी दिल्ली: मॉन्सूनच्या पावसाने संपूर्ण भारताला सामावून घेतले आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कालपासून होत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिल्लीत ४० ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचलेले तापमान सध्या ३० ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हरीयाणा, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तराखंडसहित देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलची सेवा विस्कळीत झाली असून रस्त्यांवरही पाणी साचले आहे. तर महाबळेश्वर मध्ये गेल्या २४ तासांत १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबईसह सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

असे असले तरी दक्षिण कर्नाटक, केरळ, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, विदर्भ, बिहार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये अत्यल्प पावसासह मॉन्सूनने पाठ फिरवली आहे.