09 June 12:10

मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्रांच्या घरावर बॉम्ब- आ.बच्चू कडू


मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्रांच्या घरावर बॉम्ब- आ.बच्चू कडू

कृषिकिंग, नाशिक: “आंदोलनानंतरही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. तर मुख्यामंत्रांच्या घरावर बॉम्ब टाकू” अशी जाहीर धमकी विदर्भातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

शेतकऱ्यांचा संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून डोक्यातून जात, पात, धर्म, पक्ष बाजूला ठेवण्याची गरज आहे. सुकाणू समितीच्या निर्णयानुसार आम्ही १२ जूनला राज्यभर आंदोलन करणार आहोत. तरीही शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर १३ जून रोजी रेल्वे, महामार्ग रोखले जातील. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या घराचादेखील भाजीपाला पुरवठा बंद करण्यात येईल. तरीही सरकार बधले नाही तर विमाने रोखण्यात येतील. पोलिसांनी शेतकऱ्यांऐवजी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत. महाराष्ट्रात आजवर जाती- धर्मावर खूप दंगली झाल्या, मात्र आताची ‘दंगल’ सरकारविरोधात शेतकरी अशी आहे. एवढे करूनही मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्यात येईल,’ अशी धमकीही त्यांनी दिली.

तर बैठकीत राजू शेट्टी म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा संप आता देशव्यापी बनवला जाईल. महाराष्ट्रात जो संप होईल त्याने दिल्ली नक्कीच हादरेल.

शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी करायचे असेल तर मुंबईला होणारी रसद पूर्णपणे बंद करा. तेव्हाच सरकार वठणीवर येईल. नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईला थेंबभर पाणीही जाऊ देऊ नका. तर, शेतकरी संप फोडण्याचा सरकारचा डाव असल्याचा रघुनाथदादा पाटील म्हणाले.