24 December 12:05

महिला शेतकऱ्याने कांद्याचे ४ रुपये कृषिमंत्र्यांना पाठवले; कांद्याची माळ, बांगड्यांचा आहेर


महिला शेतकऱ्याने कांद्याचे ४ रुपये कृषिमंत्र्यांना पाठवले; कांद्याची माळ, बांगड्यांचा आहेर

कृषिकिंग, पुणे: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गावच्या शेतकरी मनिषा संजय बारहाते यांना ३२ गोण्या कांदा विक्रीतून अवघे चार रुपये मिळाले. त्यामुळे संतापलेल्या या महिला शेतकऱ्याने त्या ४ रुपयांची मनीऑर्डर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना पाठवली आहे.

मनिषा यांनी चार दिवसांपुर्वी ३२ गोण्या कांदा पारनेर येथील एका व्यापाऱ्याला विकला. साधारण एक ते दोन रूपये किलोला भाव त्यांना मिळाला. त्यातून त्यांना ३२ गोण्यांचे २ हजार ३६२ रूपये मिळाले. मात्र आडत, मोटार भाडे, उचल, हमाली, लेव्ही, तोलाई, वराई, भराई, बारदाणा व इतर खर्च वजा जाता त्यांना ३२ गोण्यांचे अवघे चार रूपये हातात पडले. याच ३२ गोण्यांच्या उत्पादनासाठी मनिषा यांनी चार हजार रूपये खर्च केला हाेता. मात्र अवघे चार रूपये हातात मिळाल्याने त्यांच्या संतापात भर पडली.

त्यामुळे, केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी लगेच शिरुर येथे जाऊन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना चार रूपयांची मनीऑर्डर केली. याशिवाय केंद्रीय कृषिमंत्री यांच्या पत्नीला बांगड्यांचा बाॅक्स व कांद्याची माळ कुरीयरच्या माध्यमातून पाठवत केंद्र सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला आहे. मनिषा यांच्या या कृतीचे अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.टॅग्स