21 November 10:41

महाराष्ट्राला ट्रॅक्टर अनुदान देण्यास केंद्राचा नकार


महाराष्ट्राला ट्रॅक्टर अनुदान देण्यास केंद्राचा नकार

कृषिकिंग, मुंबई: कृषी यांत्रिकीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसाठी पाच लाखांपर्यंतचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मागील महिन्यात जाहीर केला. महाराष्ट्रासाठी मात्र ही योजना कुचकामी ठरणार आहे, कारण ऑक्‍टोबरमध्ये राज्याला ठेंगा दाखविल्यानंतर पाठपुरावा करूनही केंद्र सरकारने महाराष्ट्राला हे अनुदान देण्यास नकारघंटा वाजवली आहे.

केंद्र सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दर वर्षी कृषी यांत्रिकीकरणासाठी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत अवजारांना अनुदान देते. या वर्षी इतर अवजारांना अनुदान आहे. मात्र ट्रॅक्‍टरला महाराष्ट्रासाठी अनुदान उपलब्ध होणार नाही.

मागील वर्षी महाराष्ट्राला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यांत्रिकीकरणासाठी ३६४ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी तब्बल १८० कोटी ट्रॅक्‍टरच्या अनुदानासाठी वापरले गेले. यावर्षी २५० कोटी मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली; मात्र केंद्र सरकारने त्याला नकारघंटा वाजविल्याने ट्रॅक्‍टरचे अनुदान महाराष्ट्राकरिता तरी तूर्तास दुरापास्त ठरले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील ट्रॅक्‍टर अनुदानाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकारने ट्रॅक्‍टर अनुदान ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले असून, मागील वर्षापर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता सव्वा लाख व सामान्यांकरिता १ लाखापर्यंत असलेले अनुदान या वर्षी थेट पाच लाखांवर नेऊन ठेवल्याने आशा वाढल्या होत्या. मात्र, केंद्राकडे राज्याने पाठपुरावा करूनही नकारच मिळाल्याने या आशेवर आता पाणी पडले आहे.टॅग्स