14 June 17:05

महसूलात दुहेरी वाढ- व्हीएसटी ट्रेलर्स अँन्ड ट्रॅक्टर्स


महसूलात दुहेरी वाढ- व्हीएसटी ट्रेलर्स अँन्ड ट्रॅक्टर्स

कृषिकिंग, मुंबई: 'व्हीएसटी ट्रेलर्स अँन्ड ट्रैक्टर्सकडून यावर्षी किमान ३० हजार ट्रेलर्सची विक्री आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत मागील वर्षासारखी दुहेरी वाढ होण्याची अपेक्षा आहे.’ असे व्हीएसटी ट्रेलर्स अँन्ड ट्रैक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही.सुब्बैया यांनी सांगितले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आयएमडीने यावर्षी मान्सूनचा पाऊस (सरासरीच्या ९८ टक्के) चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय देशातील प्रत्येक राज्य सरकारांकडून ट्रेलर्स आणि ट्रॅक्टर्ससाठी योजना राबवल्या जात असून, बँकांकडूनही कृषीसाधनांसाठी मदत देण्याची घोषणा केली जात आहे. त्यामुळे आम्ही विक्रीसाठी अतिशय सकारात्मक आहोत. असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ट्रेलर्सच्या विक्रीत आम्हाला दरवर्षी ४ ते ५ टक्के वाढ अपेक्षित आहे. बाजारपेठेच्या वाढीची अपेक्षा असल्यामुळे आम्ही ट्रेलर्सची नवीन उत्पादनेही बाजारात आणत आहोत. तसेच, विक्री आणि मार्केटिंगसाठी आम्ही एक नियोजनपूर्ण योजना तयार केली आहे.

तसेच १ जुलै पासून लागू होणाऱ्या जीएसटीअंतर्गत ट्रॅक्टर्सचे पार्टस आणि अॅक्सेसरिजवर २८ टक्के कर आकारला जाणार असला तरी आम्ही जीएसटी लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. कारण जीएसटीचा कोणताही परिणाम ट्रॅक्टर्स व्यवसायावर होणार नाही, एकतर तो तटस्थ असेल किंवा तो आमच्यासाठी अनुकूल असेल. असेही त्यांनी सांगितले आहे.