05 April 11:08

मराठवाड्यासह नगर जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं; वीज पडून चौघांचा मृत्यू


मराठवाड्यासह नगर जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं; वीज पडून चौघांचा मृत्यू

कृषिकिंग, बीड/नगर: मराठवाड्यासह नगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. या वादळी पावसामध्ये वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ जण नगरचे तर बीड जिल्यातील दोघांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे आंबा, हळद, केळी, द्राक्षे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर, कैऱ्या गळून पडल्या आहेत.

याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्येही या पावसाने धुमाकूळ घातला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी सरी बरसल्या. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, कळमनुरी तालुक्यात गारपीट आणि पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातही सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सोलापूरच्या पंढरपूर, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, कालच (गुरुवार) सकाळी हवामान विभागाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वारा व विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच शेतकरी, नागरिकांनी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या कालावधीत कामे करू नये, तसेच वीज चमकत असताना झाडाखाली, उघड्यावर व पाण्याचा स्रोत असेल अशा ठिकाणी जाऊ नये. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नये, असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले होते.
कृषिकिंगने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2KiOujV