18 January 12:44

मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी इस्रायलसोबत करार


मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी इस्रायलसोबत करार

कृषिकिंग, मुंबई: सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाड्यात वाॅटर ग्रीडने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या कामासाठी इस्रायलच्या ‘मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस’ या शासकीय कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कंपनीशी सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली आहे.

इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस कंपनीद्वारे मराठवाड्यातील पाणी पुरवठ्यावर उपाययोजना आखण्यासाठी सरासरी पर्जन्यमान, धरणाची साठवण क्षमता, जलसंधारण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण, नदी खोऱ्यांमध्ये उपलब्ध असणारे पाणी, समुद्राचे पाणी गोडे करणे इत्यादी सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

१५ हजार कोटी रुपये खर्च करून या योजनेद्वारे मराठवाड्यातील सर्व गावे, शहरांना पाणीपुरवठा केला जाईल. विभागातील १२ धरणे बंद पाईपलाईनने जोडली जाणार आहेत. यातून ग्रीड तयार केली जाईल. त्यामुळे दुष्काळी भागातही पाणी पुरवठा करणे सोईचे होणार आहे. दरम्यान, अत्यंत कमी पर्जन्यमान असूनही इस्त्रायलमध्ये पाणी पुरवठ्याची सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेण्यासाठी राज्य सरकार या कंपनीशी करार केला आहे.