16 August 10:54

मराठवाडा-विदर्भातील शेतकरी सुखावले; तब्बल १ महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन


मराठवाडा-विदर्भातील शेतकरी सुखावले; तब्बल १ महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन

कृषिकिंग, बीड/परभणी/उस्मानाबाद: पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र काही भागांत ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. कालपासून काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बीडमध्ये तब्बल दीड महिन्याने पावसाचे पुनरागमन झाले असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बीडप्रमाणेच उस्मानाबादमध्येही पावसाने काल रात्रीपासून हजेरी लावली आहे. राज्याच्या अमरावती, हिंगोली या भागातही कालपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात ३७ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४९४ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात सरसरीच्या ५५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात खरिपाची पिके घेतली जातात. याशिवाय इकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार झाल्याने, कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रति सेकंद २७ हजार ७६० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग केला जात आहे.