07 March 13:01

भाव मिळत नसल्याने हजारो क्विंटल कांदा शेतातच सडतोय!


भाव मिळत नसल्याने हजारो क्विंटल कांदा शेतातच सडतोय!

कृषिकिंग, नाशिक: लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे वर्ष म्हणून यावर्षी चांगला भाव मिळेल, या आशेने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असून, मोठ्या कष्टाने दिवसरात्र राबून पिकविलेला कांदा कवडीमोल विकण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, रांगडा कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने पोळ घालून पडलेला कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.

यावर्षी थंडी पडल्याने कांदा पिकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात झाले. उन्हाळ कांद्याला लागलेली साडेसाती लाल कांद्यावरही कायम राहिली. यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी वाहतूक खर्चही मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान, रांगडा कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे. कडक ऊन पडू लागल्याने व उकाडाही वाढल्याने कांदा सडण्याची भीती आहे.

एकीकडे विक्रीस घेऊन जावे तर कवडीमोल, की ज्याने खर्चही फिटत नाही, तर उन्हात असल्याने व टिकाऊ माल नसल्याने सडण्याची भीती, अशा दुहेरी संकटात लाल कांदा सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी मातीमोल मिळणाऱ्या भावामुळे कुठे उकिरड्यात, तर कुठे जनावरांपुढे फेकला. काही शेतकऱ्यांनी खत होईल म्हणून शेतात पसरून देत त्याची नांगरणी केली आहे.

राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत विक्री केलेल्या कांद्यासाठी अनुदान जाहीर केले. मात्र, अद्याप काही बाजार समित्यांचे अनुदान जमा झाले नसल्याने शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.टॅग्स