10 December 12:58

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने वाटला मोफत कांदा


भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने वाटला मोफत कांदा

कृषिकिंग, अहमदनगर: योग्य भाव मिळत नसल्याने पुनतगाव येथील शेतकऱ्याने राज्य सरकारचा निषेध करीत नेवाशाच्या आठवडे बाजारात १,५०० किलो उन्हाळ कांद्याचे मोफत वाटप केले. मुख्यमंत्री निधीसाठी दानपेटी तयार करून त्यात दान टाकावे, असे आवाहन या शेतकऱ्याकडून करण्यात आले होते. यावेळी मोफत कांदा घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. काहींनी पाच-दहा रुपये दानपेटीमध्ये टाकले.

पोपटराव वाकचौरे यांनी नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चारचाकी वाहनावर ‘मोफत कांदा’ असा फलक लावलेला होता. ते ‘फुकट कांदे, फुकट कांदे’, अशी आरोळी देत होते. त्यांनी आणलेला तब्बल १,५०० किलो कांदा अर्ध्या तासात संपला. यापूर्वी सातारा बाजार समितीत साडेचारशे किलो कांदा विकल्यानंतर वाहतूक व हमालीचे पैसे देऊन रामचंद्र जाधव या शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहिले नव्हते. उलट त्यांना व्यापाऱ्याला जास्तीचे पाच रुपये देण्याची वेळ आली होती.

‘मोफत कांदा’ फलक: चार वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव खूश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन. प्रत्येक व्यक्तीस पाच किलो कांदा मोफत, असा उपरोधिक मजकूर वाकचौरे यांनी ‘मोफत कांदा’ या फलकावर लिहिला होता.टॅग्स