23 January 11:13

भाव मिळत नसल्याने कांद्याच्या शेतात शेळ्या-मेंढ्या सोडल्या


भाव मिळत नसल्याने कांद्याच्या शेतात शेळ्या-मेंढ्या सोडल्या

कृषिकिंग, पुणे: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावाजवळील पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.

बाजारभाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी दत्तात्रेय रावबा पवार (बापसाई वस्ती) व शेतकरी हनुमंत बाबूराव भुजबळ (वरचामळा) यांनी आपल्या गरवी जातीच्या साधारण अनुक्रमे दहा व बारा पांड कांद्याच्या शेतात शेळ्या-बकऱ्या सोडल्या आहेत.

कांदा लागवडीसाठी वावर तयार करणे, रोप तयार करणे, लागवड, दोनदा खुरपणी, औषध फवारणी, खत, काढणी, भरणी, पिशवीचा खर्च, वाहतूक खर्च, मार्केटचा खर्च हा सर्व खर्च पाहिला तर साधारण एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च लागतो, अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या कांद्याला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचा अजिबात मेळ बसत नाही. याशिवाय सरकारचे मिळणारे अनुदान हे बिलकूल परवडणारे नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आपला कांदा शेळ्या-मेंढ्यांना चारायला द्यायची वेळ आली आहे.टॅग्स