27 December 18:49

भाव नसल्याने...दीड एकर कांदा पिकात मेंढ्या सोडल्या


भाव नसल्याने...दीड एकर कांदा पिकात मेंढ्या सोडल्या

कृषिकिंग, पुणे: दोन महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करुन कांदा पिकाची लागवड केली होती. या पिकातून चार दोन पैसे मिळतील आणि त्यातून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती. पण सध्या कांद्याला जो भाव मिळतोय त्याने कांद्याचा साधा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील शेतकरी विजय काशिद यांनी आपल्या दीड एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.

मागील वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली. मात्र, भावात ५०० ते ६०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. रोज नवा कांदा बाजारात येऊ लागल्यामुळे पुढे कांद्याला बाजार भाव मिळेल की नाही, उत्पादन खर्चही सुटणार नाही. त्यामुळे अजून कशाला तोट्यात जायचं? अन् उद्या भाव वाढले तर..? असे प्रश्नांनी शेतकऱ्यांची द्विधावस्था होत आहे.

माझा दीड एकर शेतात कांदा पीक होते. मागील महिनाभरापासून बाजारभावात सुधारणा झाली नाही. शेतीची मशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात गेले आहे. तसेच पिकांची काढणी, भरणी, वाहतुक त्यातच बाजार भाव नसल्यामुळे हा खर्च पुन्हा तोट्याचा ठरणार आहे. मागील वर्षी १५ ते २० रुपये किलो बाजारभाव मिळाला होता. सध्या किलोला ५ ते ६ रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आज दिड एकर क्षेत्रावर शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. अशी वेदनादायी व्यथा शेतकरी विजय काशिद यांनी सांगितली आहे.टॅग्स