29 November 12:37

भाव नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्टरभर कांदा चौकात ओतला


भाव नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्टरभर कांदा चौकात ओतला

कृषिकिंग, नाशिक: राज्यातला शेतकरी दुष्काळानं पिचलेला असताना त्याचा शेतमालही कवडीमोल दरानं विकला जातोय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी पंढरीनाथ मेधने (सटवाईवाडी, ता.देवळा) यांनी आपला ट्रॅक्टरभर कांदा पाचकंदील चौकात आतून सरकारचा निषेध केला आहे.

तब्बल दोन ट्रॅक्टर अर्थात ५० ते ६० क्विंटल कांदा रस्त्यावर टाकण्यात आला. या कांद्याला केवळ १०५ रुपये प्रति क्विंटल अर्थात १ रुपया प्रति किलो दर मिळाला होता. या ओतलेल्या कांद्यावरून गाड्या गेल्याने चौकात चिखल झाला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

कष्टाने उभ्या केलेल्या पिकाकडे पाहत स्वप्नाचा पाठलाग करताना त्यातून दोन पैसे मिळतील या आशेने डोळे लावून अंगावरील घाम टिपत पीक वाढवायचं. पण, कवडीमोल भावामुळे ते स्वप्नं मातीमोल ठरावं ही दुर्दवी परिस्थिती सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

कांदा भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती. मात्र, आधीच दुष्काळाचे सावट आहे. त्यात पाऊस न आल्याने विहिरीही आटू लागल्या आहेत. नवीन कांदा उत्पादन येईल याची शक्यताही आता संपुष्टात आली आहे. दुष्काळाचे सावट घर करू लागल्याने पुढील पावसाळा येईपर्यंत पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा कसा मिळेल? याचीच चिंता या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.टॅग्स