23 December 08:30

भारतीय द्राक्ष निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता- यूएसडीए


भारतीय द्राक्ष निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता- यूएसडीए

कृषिकिंग, नवी दिल्ली: "देशांतर्गत खपत जास्त असली तरी भारत मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात करतो. २०१७-१८ च्या हंगामात भारतीय द्राक्ष निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ अंदाजित २ लाख ३० हजार टन इतकी राहण्याची शक्यता आहे." अशी माहिती अमेरिकन कृषी विभागाकडून (यूएसडीए) प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आली आहे.

भारतीय द्राक्ष निर्यातीच्या अनुषंगाने विचार करता नेदरलँड्स हा भारतीय द्राक्षांचा सर्वात मोठा खरेदीदार असून, तो भारताच्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी ४१ टक्के आयात करतो. तर युनायटेड किंगडम १५ टक्के आणि रशिया १० टक्के द्राक्षांची आयात करतात.

गेल्या काही वर्षांत जागतिक द्राक्ष बाजारपेठेत भारत एक प्रमुख द्राक्ष उत्पादक देश बनला आहे. भारताने दक्षिण अमेरिका आणि दक्षिणी आफ्रिकेच्या द्राक्ष बाजारातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील द्राक्ष लागवडीचे प्रमाण वाढलेले नसले तरीही द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. देशात एकूण १ लाख ३८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड केली गेली आहे. यावर्षीच्या हंगामात (२०१७-१८) १ लाख ३८ हजार हेक्टर द्राक्ष लागवडीतून, ३० दशलक्ष टन द्राक्ष उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या हंगामात १ लाख ३६ हजार हेक्टरपासून सुमारे २.८ लाख टन द्राक्ष उत्पादन नोंदवले गेले होते.

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत द्राक्ष लागवडीखालील सर्वात क्षेत्र आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्येही द्राक्ष लागवड होते. मात्र, असे असले तरी महाराष्ट्र विशेषतः नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे. एकूण द्राक्ष उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रातून होते.

एकूण उत्पादनाच्या ९० टक्के द्राक्ष हे देशांतर्गत बाजारात विक्री होतात. २०१६-१७ मध्ये देशांतर्गत द्राक्ष विक्री ही २.३३ दशलक्ष टन इतकी होती. ज्यात २०१७-१८ हंगामात टक्क्यांनी वाढ होऊन ती २.४८ दशलक्ष टन इतकी राहण्याची शक्यता आहे. तसेच देशांतर्गत उत्पादनास पूरक म्हणून विविध देशांतील द्राक्ष काही प्रमाणात आयात केली जातात.