27 November 08:30

भारतीय कांदा निर्यातीवर निर्बंध; मलेशियात भाववाढ


भारतीय कांदा निर्यातीवर निर्बंध; मलेशियात भाववाढ

कृषिकिंग, मुंबई: “भारतीय कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे मलेशिया आणि काही इतर आयातदार देशांमध्ये भाववाढ झाली आहे.” असे कांदा निर्यात-व्यापारात असलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

“राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने कांद्याच्या विदेश विक्रीसाठी अर्थात निर्यातीसाठी प्रति टन ८५० डॉलर निर्यात मूल्य लागू करण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कांदा निर्यातदार प्रति टन ८५० डॉलर पेक्षा कमी निर्यात मूल्यात निर्यात करू शकत नाही.” असे केंद्र सरकारच्या विदेशी व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे.

“मात्र सध्यस्थितीत ८५० डॉलर प्रति टन निर्यात मूल्यावर कांदा निर्यात करणे शक्य नाही. कारण इजिप्त आणि पाकिस्तान या देशांतून कमी निर्यात मूल्यावर निर्यात आणि विक्री सुरु आहे. ज्याचा त्या देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.” असे मुंबईतील एका कांदा निर्यातदाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

“तसेच भारतीय निर्यातीवरील निर्बंधामुळे बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंका या प्रमुख आयातदार देशांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली असून, तीत अजून वाढ होईल.” असेही या व्यापाऱ्याने सांगितले आहे.टॅग्स