26 May 10:26

भारताने अन्न सुरक्षेकडे लक्ष द्यावे; आम्ही तुमच्यासोबत आहोत- कॅरोला


भारताने अन्न सुरक्षेकडे लक्ष द्यावे; आम्ही तुमच्यासोबत आहोत- कॅरोला

कृषिकिंग, बारामती(पुणे): “भारत देश हा कृषी क्षेत्रातील महासत्ता आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेण्यासाठी अग्रेसर देश आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आमचा देश भौगोलिकदृष्ट्या लहान असल्याने जगाची अन्नाची संपूर्ण भूक भागवू शकत नाही. म्हणून उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान आम्ही जगाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतासारख्या मोठ्या देशाला अन्न सुरक्षेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. भारत-नेदरलँड मैत्रीला नवा आयाम देण्यासाठीच आपण बारामतीत आलो आहे.” असे प्रतिपादन नेदरलँडचे उपपंतप्रधान तथा कृषी व अन्न मंत्री कॅरोला स्कउटेन यांनी केले आहे.

त्या बारामती येथे भारत-नेदरलँड सरकारच्या द्विपक्षीय संबंधातून तयार होणाऱ्या पशुधन अनुवंश सुधारणा व उच्च गुणवत्ता केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हेही उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत संतुलित पशू आहार, विहार, रोगनिदान व उपाय, तसेच अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण वीर्य उत्पादनासाठी गोठा उभारण्यात येणार आहे. कॅरोला यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले आहे की, “डच सरकारने बारामती येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा तीन वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. शेतकरी उच्च शेती तंत्रज्ञानाच्या संधीचा नक्की फायदा घेतील असा मला विश्वास आहे.”