04 December 10:28

भारतातच नव्हे तर आशियाई बाजारपेठेत कांदा तेजीत...


भारतातच नव्हे तर आशियाई बाजारपेठेत कांदा तेजीत...

कृषिकिंग, ढाका (बांग्लादेश): कांद्याचे दर भारतातच नव्हे तर बांग्लादेश आणि मलेशिया यांसारख्या दुसऱ्या देशांतही वाढले आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्येही कांदा ८० रुपये प्रति किलो (बांग्लादेशी चलनात १०० टका) दराने विकला जात आहे. आतापर्यंत बांग्लादेशात कांद्याच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ कधी पाहायला मिळाली नाही. परंतु, सध्या बांग्लादेशात झालेल्या दरवाढीला भारतातील कांदा निर्यात मूल्यात करण्यात आलेली वाढ जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने मागील आठवड्यात देशातील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात मूल्यात वाढ करून ते प्रति टनासाठी ८५० डॉलर करण्याचा निर्णय घेण्यात होता. त्यामुळे सर्वच आशियाई देशांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच आशियाई देशांमध्ये कांदा रोजच्या आहारातील मुख्य अन्न आहे. पाकिस्तानातील बिर्याणी, मलेशियातील बेलकन, बांग्लादेशातील फिशकरी या सर्व स्थानिक मुख्य अन्नात कांद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

भारतीय कांदा निर्यातदार अजित शाह यांनी सांगितले आहे की, “८५० डॉलर निर्यातमूल्यावर खरेदीदार हे मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. वाढत्या दरात खरेदीसाठी खरेदीदार तयार नाही. कांदा उत्पादित करणाऱ्या सर्वच देशांमध्ये सध्या कांद्याचा तुटवडा आहे. मागील वर्षी विक्रमी कांदा उत्पादन झाल्यामुळे भारतातील आणि पाकिस्तानातील उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. २०१६-१७ मध्ये भारतातून २४ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. ज्यामध्ये सर्वाधिक कांदा हा बांग्लादेश, मलेशिया, आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये पाठवला गेला.”

तर ढाक्यातील कांदा व्यापारी मोहमद इदरीस यांनी सांगितले आहे की, “डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारात जेव्हा नवीन कांदा येईल, तेव्हाच दर कमी होतील.”टॅग्स