26 March 14:07

भारताकडून दिल्या जाणाऱ्या साखर अनुदानाला, आता...ग्वाटेमालाचा विरोध


भारताकडून दिल्या जाणाऱ्या साखर अनुदानाला, आता...ग्वाटेमालाचा विरोध

कृषिकिंग, नवी दिल्ली: ब्राजील आणि आस्ट्रेलियानंतर आता मध्य अमेरिकी देश ग्वाटेमालाने भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) दरवाजा ठोठावला आहे. भारताकडून ऊस आणि अन्य कृषी विषयक अनुदानाला ग्वाटेमालाने डब्ल्यूटीओमध्ये विरोध नोंदवला आहे. भारतीय शेतकऱ्यांना देण्यात येणारे साखर उद्योगासाठीचे अनुदान हे जागतिक व्यापार नियमांनुरुप नसल्याचे ग्वाटेमालाने म्हटले आहे.

ग्वाटेमालाचे म्हणणे आहे की, "भारत सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखान्यांना अनुदान सवलती देत आहे. ज्याचा थेट परिणाम हा साखरेच्या वैश्विक किंमतीवर दिसून येत आहे. भारत सरकारने देशातील ऊस उत्पादकांना मदत देण्यासाठी भरघोस अनुदान जाहीर केले आहे. याशिवाय साखर कारखान्यांना अतिरिक्त साठा कारण्यासाठीही अनुदान दिले आहे. इतकंच नाही तर भारताने वाहतूक खर्च, ऊस काढणीसाठीही कारखान्यांना अनुदान दिले आहे."

२०१७-१८ च्या गाळप हंगामात देशभरात ३२५ लाख टन इतके विक्रमी उत्पादन नोंदवले गेले होते. याशिवाय मागील वर्षीचा अतिरिक्त साठाही उपलब्ध होता. परिणामस्वरूप, साखरेच्या एकूण मागणीच्या तुलनेत देशातील साखर साठा अधिक झाल्याने दरात मोठी घसरण झाली.

दरम्यान, चालू वर्षीच्या गाळप हंगामात साखरेचे ३०७ लाख टन इतके उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशातील वार्षिक साखरेचा खप हा २४५ ते २५५ लाख टन इतका आहे.टॅग्स