10 December 11:05

भाजीपाल्याच्या शेतीला उद्योगाचे रूप; स्थैर्यमय जीवन


भाजीपाल्याच्या शेतीला उद्योगाचे रूप; स्थैर्यमय जीवन

कृषिकिंग, देवघर (झारखंड): झारखंडमधील आदिवासी बहुल देवघर जिल्ह्याच्या सारठ तालुक्यातील आरोजोरी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या शेतीला एका उद्योगाचे रूप दिले आहे. या गावातील शेतकरी मुख्यतः शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कारले, गाजर, कोबी, वाटाणा यांची शेती करत वार्षिक जवळपास २० ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

त्यांच्या या शेतीतून दररोज ४ ट्रक भाजीपाला गिरिडीह, आसानसोल, दुमका या जवळच्या शहरांमध्ये पाठवला जातो. आपल्या शेतीला बहुपीक पद्धतीचे रूप देत येथील शेतकरी प्रतिवर्षी आपल्या उत्पन्नात लाखोंची वाढ करत आहे. त्यांच्या सर्व भाजीपाला पिकांमध्ये शिमला मिरचीचा प्रयोग सर्वाधिक यशस्वी झाला आहे. जो इथले शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहे.

त्यांच्या या शेतीमुळे जवळपासच्या गावातील बेरोजगारांनाही मोठा फायदा झाला. दररोज बाहेर गावातून मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या शेतात येऊन शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कारले, गाजर, कोबी, वाटाणा यांची तोडणी करतात. तसेच लागवडीपासून सर्व मशागत करतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना मिळत असलेले हे यश त्यांच्याशी संबंधित घरं आणि परिवारांच्या घरात आनंद निर्माण करत आहे. त्यांच्या या कामात जेवढा वाटा पुरुषांचा आहे. तेवढाच महिला शेतकऱ्यांचाही आहे.

पूर्वी या गावातील लोक रोजगाराच्या शोधात बाहेरच्या प्रदेशात स्थलांतर करत होते. मात्र, या शेतकऱ्यांनी जेव्हापासून वर्षभरात एका शेतातून ३ पिकांचे उत्पन्न घेणे सुरु केले. तेव्हापासून आरोजोरी गावासोबतच आसपासच्या गावातील लोकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असून, येथील लोकांचे स्थलांतर थांबले आहे. आणि येथील लोकांच्या जीवनात एक स्थैर्य प्राप्त झाले आहे.