31 January 07:00

भाजीपाला सल्ला: असे करा वाटाणा पिकाचे नियोजन


भाजीपाला सल्ला: असे करा वाटाणा पिकाचे नियोजन

- गरजेनुसार खूरपणी करून तणनियंत्रण करावे. खुरपणीमुळे जमीन भुसभुशीत राहण्यासही मदत मिळते.
- सद्यस्थितीत पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल वातावरण आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे.
- वाटाण्याच्या शेंगा पक्व होताना त्यांचा हिरवा रंग बदलत जाऊन फिकट होतो. हिरवट गोलाकार शेंगा दर दोन ते तीन दिवसांनी काढणीस तयार होतात. शेंगांची काढणी लागवडीखालील क्षेत्राचा अंदाज घेऊन २ ते ४ आठवड्यांत पूर्ण करावी. काढणीचा पूर्ण हंगाम ३ ते ४ तोडण्यांमध्ये आटोपेल असे नियोजन करावे.

पाणी व्यवस्थापन नवीन लागवडीत बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- सद्यस्थितीत फुले लागण व शेंगा लागण झालेल्या पिकास योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. अशा काळात फुले आल्यापासून शेंगाचा बहर पूर्ण होईपर्यंत ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पीक संरक्षण
१) मर रोग नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियांना थायरम २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- विद्राव्य गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- वारंवार एकाच जमिनीवर वाटाणा हे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.

२) शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ५ मि.लि. किंवा क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) १.६ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी करावी.

३) मावा/ तुडतुडे/ फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क- ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- आवश्यकतेनुसार १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

-डॉ. एस.एम. घावडे , मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82