17 August 15:05

भाजप प्रवेश नाहीच!- सदाभाऊ खोत


भाजप प्रवेश नाहीच!- सदाभाऊ खोत

कृषिकिंग, कोल्हापूर: “सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली. पण काही मंडळींनी भाजप प्रवेशाशी नाव जोडून बदनामी करण्याचा ठेका घेतला असला तरी आपण भाजप प्रवेश करणार नाही,” अशा शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवणारे सरकारमधून कधी बाहेर पडणार, याचा शोध घेणार असल्याचा टोलाही खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना हाणला आहे.

शाहूवाडी येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री खोत आले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्यावरही त्यानी हल्ला चढविला. सहानुभूतीसाठी आपण कधी चळवळ केली नाही. आयुष्यात कुणामध्ये फूट पाडण्याचे काम केले नाही; पण काही मंडळींनी यासाठीच आतापर्यंत काम केले, असे खोत म्हणाले. आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनेकवेळा पदयात्रा काढल्या, पण आमच्या पायाला कधी फोड आले नाहीत. कारण आमचे वडील वारकरी होते, त्यांनी अनेक वाऱ्या केल्या होत्या, त्यांचा वारसा मी चालवला. त्यामुळे आमचे पाय वडिर्लोजित मजबूत असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करण्याचे संकेतही सदाभाऊंनी दिले. महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्यांनी माझ्यावर प्रेम केले. त्या सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. असे म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करण्याचे स्पष्ट संकेतही सदाभाऊंनी दिले आहे.टॅग्स