16 December 14:55

बोंडअळी समस्येच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन


बोंडअळी समस्येच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

कृषिकिंग, चंडीगड गुलाबी बोंडअळीने या वर्षी महाराष्ट्र आणि तेलंगाना मध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळी समस्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाला नियमितपणे देखरेखीसह सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पंजाब कृषी विद्यापीठाने पंजाबमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

२०१५ मध्ये झालेल्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पंजाबमधील कापूस उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भटिंडाच्या प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राकडून तेथील कापूस उत्पादकांना काही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याची शक्यता टाळली जाऊ शकते.

सध्या महाराष्ट्रामध्ये ४.२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १.३ लाख हेक्टरवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या गुलाबी बोंडअळीच्या संकटामुळे पंजाबातील काही शेतकऱ्यांनी भविष्यात कापसाच्या किंमतीत वाढ होण्याच्या अपेक्षेने कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब सरकारने, पंजाब कृषी विद्यापीठाला संकरीत बियाणे आणि गुणवत्तायुक्त किटकनाशकांच्या वापरासंबंधी जागरुकता अभियान सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंजाबमध्ये कापूस हे भातानंतरचे दुसरे प्रमुख खरीप पिक आहे. पंजाबच्या २०१७ च्या कृती आराखड्यानुसार, कापूस उत्पादनाचे ४ लाख हेक्टरचे लक्ष होते. त्यापैकी ३.८२ लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आले. तर २०१६ मध्ये हेच क्षेत्र २.५७ लाख हेक्टर होते आणि कापसाचे एकूण उत्पादन ८.९० लाख गाठी झाले असून, उत्पादकता २२ क्विंटल प्रति हेक्टरी होती.