30 November 11:55

बनावट कीटकनाशके बनविणाऱ्या, विक्री करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई सुरु- सदाभाऊ खोत


बनावट कीटकनाशके बनविणाऱ्या, विक्री करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई सुरु- सदाभाऊ खोत

कृषिकिंग, मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशके व साहित्य बनविणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई सुरु असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. यासंबंधी विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आढळून आलेल्या गंभीर उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने १७ कृषी केंद्रांचा बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्रीचा परवाना ५ नोव्हेंबर २०१८ पासून परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी रद्द केलेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर १ व तालुकास्तरावर १६ अशा एकूण १७ भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारणाकरिता टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.