16 August 10:38

फडणवीसांच्या केंद्रातील वर्णीसह तर राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता


फडणवीसांच्या केंद्रातील वर्णीसह तर राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेकांना मंत्रीपद गमवावे लागणार असून अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.

मात्र पक्षातील सुत्रांनी सांगितले आहे की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काहींची मंत्रीपदे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्र्यांवर आणि उद्योगमंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात लागलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले. दोन्ही मंत्र्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत. त्यांनी चौकशी अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रात दीड वर्षांनंतर होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा लक्षात घेत त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. असे घडल्यास मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार कोण पाहणार हा मोठा प्रश्न असेल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा यासाठी विचार करण्यात येत आहे. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकाचवेळी घेण्याच्या मुद्द्याचाही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.