11 December 12:34

पुन्हा एका शेतकऱ्याने केली पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर


पुन्हा एका शेतकऱ्याने केली पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

कृषिकिंग, पुणे: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथील शेतकरी दिनेश नामदेव काळे यांचे कांदा उत्पादनातून नुकसान झाले. त्यांचा खर्च ४५ हजार झाला. तर उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यातून उद्विग्न होऊन त्यांनी बारामती येथे चक्क दोन टन कांदा नागरिकांना फुकट वाटला. या वेळी ठेवण्यात आलेल्या दानपेटीत जमा झालेली १ हजार ४१९ रुपये एवढी रक्कम या शेतकऱ्याने पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना पोस्टाने ‘मनीआॅर्डर’द्वारे पाठवली आहे.

कांद्याला भाव मिळत नसल्याने ५ डिसेंबर रोजी त्यांनी नागरिकांना फुकट कांदा वाटला. ‘कांदा नेणाऱ्यांनी स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहेत,’ असा फलक या ठिकाणी लावला होता. या वेळी कांदा मोफत नेणाऱ्या नागरिकांनी दानपेटीत २ हजार ८३८ रुपये जमा केले होते. काळे यांनी ही रक्कम समान विभागून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरने पाठविली आहे.

काळे यांचे जैनकवाडी परिसरात दीड एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली. त्यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. दीड एकरात १५० पिशव्या कांदा उत्पादन झाले. त्यांपैकी १२० बॅग कांदा कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला. या कांद्याला त्यांना प्रतिकिलो अवघा ४ रुपये भाव मिळाला. कांदा विक्रीतून वाहतूक खर्च वगळता १२ हजार ४८८ रुपये त्यांच्या हाती आले. त्यांपैकी बारदान्याचा ३,५०० रुपये खर्च वजा जाता ८ हजार ९८८ रुपये उरले. त्यामुळे खर्च ४५ हजार झाला; उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यामुळे काळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

दिनेश काळे यांनी शेती विकसित करण्यासाठी कॅनरा बँकेकडून चार वर्षांपूर्वी ७ लाख रुपये कर्ज घेतले होते. आता व्याजासह ही रक्कम ११ लाखांवर पोहोचली आहे. हे कर्ज भरण्यासाठी आता बँकेकडून तगादा चालू झाला आहे. त्यामुळे कष्ट करून देखील उपयोग नसल्याची त्यांची भावना आहे.टॅग्स