14 December 11:08

पुन्हा एका शेतकऱ्याची मुख्यमंत्री फडणवीसांना ३१० रुपयांची मनीऑर्डर


पुन्हा एका शेतकऱ्याची मुख्यमंत्री फडणवीसांना ३१० रुपयांची मनीऑर्डर

कृषिकिंग, नाशिक: सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नाशिकमधील सटाणा बाजार समितीत एका शेतकऱ्याला १७ क्विंटल नवीन लाल कांदा विकून अवघे २३७० रुपये मिळाले आहे. रवींद्र भाऊराव बिरारी असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

रवींद्र बिरारी यांच्या हातात ट्रॅक्टरचा वाहतूक खर्च वजा करून अवघे ३७० रुपये शिल्लक राहिले. त्यात ६० पोस्टल खर्च वजा करून उरलेले ३१० रूपये मुख्यमंत्र्यांना पाठवत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

या शेतकऱ्याला प्रति क्विंटलला २२ रुपये भाव मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने हे केल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षीचा दहा ट्रॉली उन्हाळ कांदा चाळीत पडून आहे, तर नवीन दहा एकर लाल कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने आपले कुटुंब आर्थिक गर्तेत सापडल्याचेही बिरारी यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरात अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही निघेना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीऑर्डर करून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना सरकार काही पावलं उचलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.टॅग्स